पूर्वोतिहास

सुमारे सातशे-आठशे वर्षापूर्वी घडलेली दंतकथा आहे. आज शंकराची पिंडी असलेल्या जागेभोवती आंजणी नावाच्या वृक्षांचे रान होते. त्या रानात दररोज एक गाय येऊन पिंडी असलेल्या जागी दुधाची धार सोडत असे. हे स्थानिक लोकांच्या ध्यानात येऊन तेथे पाहता, शंकराची पिंडी स्वयंभू आहे असे दिसले. याच सुमारास साखर गोठिवरे येथील गोखले घराण्यातील एक अनाथ गरोदर विधवा बाई (तेथील लोकांच्या जाचामुळे ) मु. मिठगवाणे येथे पळून आली. स्थानिक लोकांनी तिला आश्रय दिला. नंतर तिला पुत्र रत्न होऊन त्यांचा वंश सुरू झाला. तो मोठा झाल्यावर चरितार्थासाठी काही थोडा जमीन जुमला उपलब्ध केला. पुढे याच गोखल्यांनी वरील जागेवर एक लहान घुमटीवजा देऊळ बांधून शंकराच्या पिंडीची तेच पूजा-अर्चा करू लागले, आणि त्याच देवालयाला श्रीदेव अंजनेश्वर म्हणू लागले. यथा अवकाश गोखले यांची वंशवृद्धि झाल्यामुळे आपला चरितार्थ योग्य रीतीने चालत नाही आणि देवाची पूजा नित्य बंद होणे योग्य नाही म्हणून त्यांनी श्रींच्या पूजेसाठी बाहेरगावाहून लिंगायत गुरव आणून त्यांची तेथे वस्ती करविली व आपली शेतजमीन पूजा-अर्चेच्या मोबदल्यात त्यांना देऊन आपण मजरे- होळी या गावी जाऊन राहिले. अद्यापी श्रीदेव अंजनेश्वराचे देवालयातील पहिली वसंतपूजा गोखले यांचीच होत असून देवाला नारळ ठेवावयाचा असल्यास गोखले कुळातील गृहस्थाने स्वतः ठेऊन गा-हाणे घालून (प्रार्थना करून) तो त्यानेच फोडावा अशी प्रथा आहे.गोखले घराण्याखेरीज कोणाचाही नारळ लिंगायत गुरवाकरवीच ठेवला जात असून तो फोडण्याचा झाल्यास गुरवांशिवाय दुसऱ्या कोणालाही फोडण्याचा अधिकार नाही.

लहान घुमटीचे देवालयात झालेले रूपांतर

मिठगवाणे गावापर्यंत आलेल्या समुद्राच्या फासूमध्ये गलबतांची रहदारी चालू असताना एकदा अचानक मोठे वादळ होऊन मलबारकडील एक गलबत बुडण्याच्या परिस्थितीत येऊन सापडले. अशा परिस्थितीत गलबताच्या नावाड्याने “माझे गलबत सुखरूपपणे किनाऱ्याला लागल्यास त्या ठिकाणी असलेल्या देवाचे वाढीव देवालय बांधून देईन असा त्याने मनोभावे त्या देवाला नवस (प्रार्थना) केला आणि त्याचे गलबत संकटातून वाचले म्हणून त्याने त्या लहान घुमटीचे देवालयात रूपांतर केले. या देवालयाच्या बांधकामासाठी लागलेले लाकूडसामान व कारागीर खास मलबारहून आणले होते, अशी दंतकथा आहे. त्या वेळच्या बांधकामाच्या कौशल्याचे काही अवशेष अजूनही मूळ देवालयात पहावयास मिळतात. यानंतर शके १८२२ मध्ये मुक्काम जानशी येथील कै. नरसिंह चिंतामण जोशी (गोसावी) यांनी सुमारे दोन हजार दोनशे रुपये खर्च करून भव्य सभामंडप बांधला. देवालयाचे आवार देवालयाच्या सभोवार चिरेबंदी तट असून आतील सर्व मोकळी जागा चिरेबंदी फरशीने बांधलेली आहे.त्यामुळे सबंध आवार स्वच्छ असते.देवालयाच्या आवारात उजव्या बाजूला एक लहानसे कालभैरवाचे देवालय आहे. डाव्या बाजूला देवालयाला लागूनच पाण्याची मोठी विहीर (आड) आहे. ही विहीर संपूर्णपणे काळ्या खडकात असल्यामुळे तिचे पाणी अव्याहत थंडगार, गोड व पाचक असते. या विहिरीच्या पाण्याने स्नान केल्यास अंगावरील खरूज-कांटा नाहीसा होतो असा अनेकांचा अनुभव आहे.आवारात आल्याबरोबर प्रथम याच विहिरीच्या पाण्याने हात-पाय धुऊन मगच देवालयात जाण्याची प्रथा आहे व मग सोमसूत्री प्रदक्षिणा घालून दर्शन घेतात. देवालयाचे महाद्वार भव्य चिरेबंदी असून त्यावरच नगारखाना आहे. महाद्वारात उभे राहिल्यावर गाभाऱ्यातील देवाचे सरळ रेषेत सहज दर्शन घडते. महाद्वारासमोर व देवालयाला लागूनच एक तुलसीवृंदावन व देवभक्तांनी बांधलेले अनेक चिरेबंदी भव्य त्रिपुरस्तंभ आहेत. देवालयाच्या सभामंडपाच्या कोपऱ्याबाहेरील बाजूला सुमारे पन्नास फूट उंचीचा देवाचा ध्वजस्तंभ आहे. देवालयाच्या उजव्या बाजूला भिंतीत एक कोनाडा असून त्यात एक दगडी स्मारक आहे. ज्याने नवस करून हे देवालय बांधून दिले त्या पुरुषाने देवालयाच्या कळसावरून उडी घेऊन प्राणोत्क्रमण केले त्याचेच वरील स्मारक आहे असे मानले जाते.तेथे दररोज दिवा लावण्याची प्रथा आहे.

देवस्थानचे विश्वस्त

श्री देव अंजनेश्वर ट्रस्टची धर्मादाय दप्तरी नोंद झाली सन १९५२ सालामध्ये…..ती नोंद दोन देसाई कुटुंबातील कै.सदाशिव लक्ष्मण उर्फ बाबुराव देसाई व कै.गणेश बाळकृष्ण तथा आबा देसाई यांनी केली आहे…. थोडक्यात या ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी “दोन देसाई”…. यांना “General manager” म्हणून संबोधले आहे. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.